Lok Sabha Election: रायगडमधून तीन अनंत गीते निवडणूक रिंगणात

अलिबाग – रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच वेळी अनंत गीते नावाच्या आणखी दोन जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातून एकाच वेळी तीन अनंत गीते निवडणूक रिंगणात असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास १२ एप्रिल पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या अर्जाचा समावेश होता.
दरम्यान शिवसेना नेते अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापुर्वी अनंत पद्मा गिते आणि अनंत बाळोजी गीते यांनी आपल्या सूचकांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे रायगडमधून तीन अनंत गीते नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांना उभे करून प्रस्थापित नेत्यांची कोंडी करण्याची खेळी विरोधकांनी यावेळेसही खेळली असल्याचे या निमित्ताने दिसून आले. याशिवाय नितीन मयेकर आणि शेकापचे आस्वाद पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.





