मुंबई – मराठवाड्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्वाचे कारण मनोज जरांगे यांचे मराठा आंदोलन फॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून सुरुवात केली. आंतरवली सराटीत त्यांनी उपोषण केले. त्यांच्या उपोषणस्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले. परंतु त्यांची सगेसोयऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला. संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांनी विजय मिळवला आहे. मराठवाड्यातील हे दोन मतदार संघ वगळता इतर सर्व ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे जालन्यामधून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. कारण तिथे कल्याण काळे हे सुमारे 50 हजार मतांनी पुढे होते. विदर्भात देखील भाजपला धक्का मराठवाड्याप्रमाणे विदर्भातील निकाल भाजपसाठी धक्कादायक राहिले. विदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. परंतु विदर्भातील दहा जागांपैकी बुलढाणा आणि नागपूर वगळता इतर सर्व ठिकाणी महायुतीचा पराभव झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभाही झाल्या होत्या. त्या सभांना चांगली गर्दी होती. परंतु ही गर्दी मतांमध्ये परावर्तीत झाली नाही. मंगेश साबळेंचा करिष्मा मराठा अंदोलनात समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारे अभिनव अंदोलन करून प्रसिद्धी झोतात आलेले फुलंब्रीचे सरपंच मंगेश साबळेंनी या निवडणूकीत घेतलेले मतदान निर्णायक ठरले. या नवख्या उमेदवाराने तब्बल १ लाख ३३ हजार इतकी मते घेवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तसेच रावसाहेब दानवेंसारख्या दिग्गज नेत्याच्या पराभवासही तेच कारणीभूत ठरले आहेत. मराठा अंदोलनात अँड.गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडल्यानंतर साबळेंना प्रसिद्धी मिळाली होती.