नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील पाच टप्प्याचे मतदान झाले असून २५ मे आणि १ जून रोजी उर्वरित दोन टप्प्यांचे मतदान होणे आहे. या पाच टप्प्यात मतदान कमी झाल्यामुळे आयोगासह राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. अशातच, उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान प्रभावित होण्याची शक्यता आहे. देशात उष्णतेची लाट आली आहे. देशाच्या राजधानीसह उत्तर भारतातील जनता उन्हामुळे त्रस्त झाली आहे. शाळांना अचानक सुटी देण्यात आली आहे आणि लोकं घराबाहेर पडण्याऐवजी घरातच राहणे पसंत करीत आहेत. हवामान खात्याने उष्णतेची लाट या आठवड्यात अशीच कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. येत्या शनिवारी २५ मे रोजी ५७ जागांवर निवडणूक होणे आहे. यात दिल्लीतील सात आणि हरियाणातील १० जागांचाही समावेश आहे. दिल्लीतील तापमान 48 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. हवामान खात्यानुसार या आठवड्यात सूर्य असाच तापणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये आजपासून ४ दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरच्या जम्मू विभागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशात,दिल्ली आणि हरियाणासह आसपासच्या भागात मतदान होणे आहे. आधीच मतदान कमी होत आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष चिंतीत आहेत. यात उन्हाची भर पडली आहे. उन्हामुळे मतदान मतदान करायला बाहेर पडणार नाही, अशी भीती आयोग आणि पक्षांच्या मनात निर्माण झाली आहे.