‘सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं…’

Lok Sabha Election 2024 । राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला १८ तर महा विकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या आहे. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने राज्यात बारामतीसह १० पैकी 8 जागांवर जागांवर विजय मिळवला. तर महायुतीतील अजित पवार यांच्या पक्षाला फक्त १ जागा जिंकता आली.
या निकालानंतर आता अनेक ठिकाणी शरद पवार गटाकडून पोस्ट लावण्यात आले आहे. कोल्हापूरमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापूरी शैलीत पवारांची स्तुती करत अजित पवार आणि विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे. बॅनरवर लिहिण्यात आले आहे की ‘सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं..’ सध्या या बॅनरची चर्चा सर्वत्र होत आहे. बॅनरबाजीतून अजित पवार यांना चांगलाच चिमटाही काढण्यात आला आहे.
हे बॅनर कोल्हापूरमधील दाभोळकर चौक परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेला आहे. या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेली तुतारी हा फोटोही असून या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.





