Lok Sabha Election 2024 : ‘यंदाची निवडणूक ही भाजपच्या नव्हे, भारताच्या विजयाकरता’ – देवेंद्र फडणवीस

नागपूर – 2024ची निवडणूक ही भाजपच्या नव्हे भारताच्या विजयाकरता आहे. पुन्हा एकदा मोदी या देशाचे पंतप्रधान झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवा मग भारताला कुठेही मागे वळून पाहावे लागणार नाही. भारताला बलशाली घडवण्याची संधी ही तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. म्हणून आता पुढचा एक-दीड महिना केवळ देशाकरता, मोदींकरता आणि बलशाली भारताकरता द्या, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चा आणि नमो युवा महासंमेलनात ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये विदर्भातील आणि महाराष्ट्रातील युवाशक्ती पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान बनवण्याकरता संकल्प घ्यायला याठिकाणी एकत्रित आली आहेत. “अबकी बार” हा संकल्प आमचे युवा नागपूरच्या भूमीतून आज घेणार आहेत.
गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आपण बघितले आहे. त्यामुळे मोदींना 400 पेक्षा जास्त जागा का द्यायच्या? पुन्हा नमो सरकार का आणायचे? याची अनेक कारणे आहेत. पण 2047 साली विकसित भारताचे एक स्वप्न घेऊन आता मोदी निघालेले आहेत आणि आपल्या सर्वांना मोदींना साथ द्यायची आहे, असे फडणवीस म्हणाले.





