Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया समाप्त झाली. आता संपूर्ण देशाचे लक्ष असेल ते निकालाकडे. मतमोजणीचा मुहूर्त जवळ येऊन ठेपल्याने सर्व राजकीय पक्षांची आणि प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढणार आहे. मतदान प्रक्रियेचा प्रारंभ पहिल्या टप्प्याने १९ एप्रिलला झाला. त्या टप्प्यात निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना निकालासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. आता ४ जूनला जाहीर होणाऱ्या निकालामुळे ती प्रतीक्षा संपेल. मात्र, निकाल काय लागणार याविषयी त्यांना वाटणारे टेन्शन वाढेल. तशीच अवस्था बहुतांश राजकीय पक्षांची असेल. यावेळच्या निवडणुकीला सगळेच पक्ष प्रचंड ताकदीने सामोरे गेले. केंद्राची सत्ता सलग दोन वेळा काबीज केलेल्या भाजपने हॅट्ट्रिक करण्याच्या इर्षेने निवडणूक लढवली. तर, भाजपला यावेळी रोखण्याचा निर्धार करून विरोधक लढले. भाजपने मित्रपक्षांसमवेत लोकसभेच्या ४०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले. तर, विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन करून भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले. प्रमुख प्रतिस्पर्ध्यांकडून चांगल्या कामगिरीचा विश्वास व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात काय घडणार याचा फैसला करणारी मतमोजणी आता समीप आली आहे.