‘फडणवीसांच्या मागे धावत आहेत ते सगळे चमचे हे महाराष्ट्राचे शत्रू’ राऊतांची जहरी टीका

Lok Sabha Election 2024 । लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहे. यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारूण पराभव झाला आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या निकालावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नाहीतर फडणवीस यांनी असेही म्हटले की, नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. पण मी हरणारा नाही, पण ताकदीने मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी, असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती केली आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना यावर महाराष्ट्रात सूडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलं. ते यापूर्वी कधीच नव्हतं असं म्हणत टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले,’देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. देवेंद्र फडणवीस हे पेशवाईतल्या आनंदीबाईंप्रमाणे वागत आहे. महाराष्ट्रात सूडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलं. ते यापूर्वी कधीच नव्हतं, लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांच्या फडतूस राजकारणाचा बदला घेतला. मराठी माणसाला महाराष्ट्राचा नाश करणारं राजकारण नको होतं. आता जे देवेंद्र फडणवीसांच्या मागे धावत आहेत ते सगळे चमचे हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत’ असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.





