Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगाल मध्ये ममतांची जादू कायम; भाजपला गेल्यावेळे इतक्याही राखता आल्या नाहीत जागा

Narendra Modi | Mamata Banerjee – पश्चिम बंगाल मधील लोकसभेच्या ४२ जागांसाठी मोठेच राजकीय घमासान झाले. ममतांचा गड काबिज करण्यासाठी भाजपने येथे मेाठीच ताकद लावली होती, पण तरीही या राज्यावरील आपली पकड मजबूत ठेवण्यात ममतादिदी यशस्वी ठरल्या असून त्यांनी ४२ पैकी ३० जागांवर यश मिळवले आहे.
भाजपला येथे गेल्या लोकसभा निवडणुकी इतकीही कामगिरी करता आली नाही. त्यांना यंदा ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये एकूण १८ जागा मिळाल्या आहेत. यावेळी किमान २५ जागा मिळवण्याचे त्यांचे लक्ष होते. पण ते स्वप्न अधुरेच राहिले.
या निवडणुकीत संदेशखलीतील हिंसक प्रकाराचे मोठे राजकीय भांडवल भाजपने केले हेाते. त्यामुळे यावेळी येथील निवडणूकीचे वातावरण फिरणार असल्याचे भाकीत केले गेले परंतु तेही खोटे ठरले आहे. सायंकाळपर्यंत हाती आलेल्या निकालाच्या स्थिती नुसार डायमंड हार्बर मतदार संघातून ममतांचे भाचे व तृणमुल कॉंग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी प्रचंड मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी अभिजीत दास यांचा ७ लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. आसनसोल मतदार संघात तृणमुल कॉंग्रेसचे उमेदवार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुरेंद्र सिंह यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. जोयानगर मतदार संघात तृणमुलच्या उमेदवार प्रतिमा मंडल या साडेतीन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.
विष्णुपुर मतदार संघात भाजप आणि तृणमुल उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस दिसून आली. तृणमुल कॉंग्रेसच्या बहुचर्चीत उमेदवार महुओ मोईत्रा यांनी प्रचंड मताधिक्क्यांनी कृष्णनगर मतदार संघातून विजयी झाल्या आहेत. सायंकाळी सात वाजता त्यांचे मताधिक्या सहा लाख मतांपेक्षा अधिक होते.





