Lohgaon News: लोहगावच्या विकास आराखड्याला कात्री! ३१ आरक्षणांमध्ये फेरबदल
Lohgaon News: विकास आराखडा अंतिम मान्यतेसाठी पाठवला शासनाकडे; १७ रस्ते पूर्णपणे रद्द

प्रकाश बिराजदार
विश्रांतवाडी : लोहगावच्या प्रारूप विकास आराखड्यावर (डीपी) नागरिकांकडून हरकती व सूचना मागवून त्यावर सुनावणी घेतल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित विकास आराखडा अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या आराखड्यात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत.
तब्बल ३१ आरक्षणांमध्ये बदल करण्यात आल्याने लोहगावच्या भविष्यातील विकासाचे नियोजन नेमके कोणत्या दिशेने जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले १७ रस्ते पूर्णपणे वगळण्यात आले असून, १३ रस्त्यांची प्रस्तावित रुंदी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे लोहगावच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनेक आरक्षणांमध्ये बदल
प्रारूप विकास आराखड्यामध्ये लोहगावच्या विविध भागांत रस्ते, शाळा, खेळाची मैदाने, रुग्णालये, पाण्याच्या टाक्या आणि उद्यानांसाठी आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, हरकती व सूचनांवरील सुनावणीनंतर प्रसिद्ध झालेल्या आराखड्यात यापैकी अनेक आरक्षणांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
चार खेळाच्या मैदानांची आणि चार शाळांची आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय रुग्णालये, पाण्याच्या टाक्या आणि उद्यानांच्या आरक्षणांमध्येही फेरबदल करण्यात आल्याने भविष्यातील नागरी सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण बदलांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोहगाव-वाघोली मुख्य रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय. प्रारूप विकास आराखड्यात या रस्त्याची रुंदी काही ठिकाणी ३६ मीटर, तर काही ठिकाणी ४५ मीटर प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, सुधारित आराखड्यात ही रुंदी २४ मीटर करण्यात आली आहे.
लोहगाव आणि वाघोली या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. या भागातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण, वाहनांची संख्या आणि भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेता रस्त्याची रुंदी कमी करणे अयोग्य ठरू शकते.
वाहतुकीचा प्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता
आधीच या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असताना मुख्य रस्त्याची रुंदी कमी केल्यास भविष्यात वाहतुकीचा प्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. तसेच रस्ते आणि सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक असलेल्या जागांचे आरक्षण कमी झाल्यास भविष्यात त्या सुविधा निर्माण करताना प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
लोहगावचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, नव्याने उभ्या राहत असलेल्या गृहप्रकल्पांची संख्या आणि वाढत्या नागरी सुविधांची गरज लक्षात घेता विकास आराखडा तयार करताना केवळ सध्याच्या परिस्थितीचा विचार करून चालणार नाही.
पुढील ३० ते ५० वर्षांतील लोकसंख्या, वाहतूक, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजनाच्या सुविधांचा विचार करून नियोजन होणे आवश्यक आहे. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या विकास आराखड्याचा या सर्व बाबींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सखोल विचार होणे गरजेचे आहे.
रस्त्यांची रुंदी कमी करणे, महत्त्वाची आरक्षणे रद्द करणे आणि सार्वजनिक सुविधांच्या जागांमध्ये बदल करणे यामुळे लोहगावच्या नियोजित विकासाला अडथळे निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे शासनाने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांच्या हरकती, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकासाचा विचार करून आराखड्यात आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विकास आराखड्याचा फेरविचार करणे आवश्यक
लोहगावचा विकास केवळ आजच्या गरजांपुरता मर्यादित न ठेवता पुढील पिढ्यांच्या दृष्टीने शाश्वत आणि नियोजनबद्ध व्हावा, यासाठी शासनाने या विकास आराखड्याचा फेरविचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
याबाबत हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबापू खांदवे म्हणाले, मुख्य रस्ते हे मोठेच असले पाहिजेत. हरकती घेतलेले एक्झिबेशन सेंटर वगळण्यात आले नाही. शिवाय १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय असताना पुन्हा शेतक-यांच्या जमिनीवर रुग्णालयाचे आरक्षण टाकण्यात आले आहे ते कायम आहे.
अंर्तगत रस्त्यांचेही डीपीमध्ये मार्किंग करणे आवश्यक होते. खंडोबा माळ, पवार वस्तीकडे जाणारा रस्ता १२ मीटर प्रस्तावित केल्याने त्याचा फायदा होईल. पण अंतर्गत रस्ते रद्द करण्याऐवजी त्याची रुंदी कमी केली पाहिजे होती.





