Lohagad Fort Accident: काही दिवसांवर आले होते लग्न! लोहगड किल्ल्यावरील त्या एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं
Lohagad Fort Accident: लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर गुरुवारी घडली हृदयद्रावक घटना; २४ वर्षीय केतनच्या निधनाने मित्रपरिवारासह परिसरात हळहळ.

Lohagad Fort Accident – लग्न आता काही दिवसांवर येऊन ठेपले होते. कुंटुंबात आणि मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण होते. अशातच आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक तरुण आपल्या मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर गेला आणि आनंदाच्या वातावरणावर दु:खाचे सावट पसरले. वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रपरिवारासह लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. १८) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल (वय २४) हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमंडळीसह लोहगड किल्ल्यावर गेला होता. किल्ल्यावरील विविध ठिकाणी फिरत असताना ओलसर आणि निसरड्या भागातून जाताना त्याचा अचानक तोल गेला. त्यामुळे तो थेट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक संस्थेचे बचाव पथक, स्थानिक ट्रेकर्स तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बचावकार्य राबवून केतनला दरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. केतन अग्रवाल हा गहुंजे परिसरातील लोढा हौसिंग कॉम्प्लेक्स येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून मित्रपरिवारालाही मोठा धक्का बसला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले व पर्यटनस्थळांवर ट्रेकिंग करताना पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन बचाव पथकांकडून करण्यात आले आहे. ओलसर व निसरड्या भागात सेल्फी काढणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

