लॉकडाऊनचा एसटीला कोट्यवधींचा आर्थिक फटका

पुणे – लॉकडाऊनच्या काळात एसटी सेवा बंद असल्याने कोट्यवधींचा आर्थिक फटका बसला आहे. या परिस्थितीतून एसटीला बाहेर काढण्यासाठी सरकारने 1 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. त्याचबरोबर यंदा झालेला कर्मचाऱ्यांच्या पगाराचे आतापासून नियोजन करावे, अशा मागण्या संघटनांकडून होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार वर्गवारीनुसार 50 टक्के आणि 75 टक्के देण्यात आला आहे. या पगाराचे वाटप सरकारकडील 150 कोटींची थकबाकी मिळाल्यानंतर केले. पगारासाठी निधीची तरतूद न केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराला विलंब झाला होता. या पार्श्वभूमीवर एप्रिलचे पगार वाटप करताना याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आर्थिक नियोजन करावे, अशी मागणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.
सोमवारपासून राज्यात काही ठिकाणी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसह खोळंबलेल्या मजुरांना त्यांच्या मूळगावी पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या काळात एसटीला टोलमाफी द्यावी, अशी मागणीही इंटकने केली आहे.





