एलजी पॉलिमरला टाळे ठोका; हायकोर्टाचे आदेश

अमरावती (आंध्र प्रदेश) – अलीकडेच गॅस गळती झालेल्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर कंपनीला टाळे ठोकण्याचे आदेश आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कंपनीच्या संचालकांनाही देशाबाहेर जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.
कंपनीच्या ज्या भागात गॅस गळती झाली होती, तेथे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या सदस्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश करण्यास मज्जाव करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कंपनीच्या संचालकांनी न्यायालयाच्या आदेशाशिवाय देशाबाहेर जाऊ नये आणि या संचालकांचे ताब्यात घेतलेले पासपोर्ट पूर्वपरवानगीशिवाय परत देण्यात येऊ नयेत, असे न्यायालयाने 22 मे रोजीच्या आदेशातच म्हटले होते.
गॅसगळतीतील पीडितांना न्याय देण्यात यावा, ही फॅक्टरी सध्याच्या ठिकाणापासून दूर हटवावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने दिले आहेत.
कंपनीचा परिसर पूर्णपणे बंद केला जाईल आणि कंपनीच्या संचालकांसह कोणालाही आवारात प्रवेश देता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.
विशाखापट्टणमजवळील आरआर वेंकटापुरम येथे 7 मे रोजी एलजी पॉलिमर प्लांटमधून स्टायरीन वायूची गळती झाल्याने एका अल्पवयीन मुलासह 12 जणांचा मृत्यू झाला, तर विषारी वायू हुंगला गेल्यामुळे अनेकजण आजारी पडले.





