प्रभात वृत्तसेवा विंझर – हवेली तालुक्यातील शिवगंगा खोरे सध्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या जोरदार चर्चेने ढवळून निघाले आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नसतानाही, गावोगावी मतदारांमध्ये आणि संभाव्य उमेदवारांमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून, संपूर्ण शिवगंगा खोऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख गावांमध्ये उमेदवारीचे डावपेच.. शिवगंगा खोऱ्यातील कल्याण, कोंढणपूर, रहाटवडे, आर्वी, शिवापूर, खेडशिवापूर, गोगलवाडी, गाऊडदरा, आणि शिंदेवाडी यांसारख्या प्रमुख गावांमध्ये बैठका आणि गाठी-भेटींचे सत्र सुरू झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या संभाव्य गट आणि गणांमध्ये ‘जनसंपर्क’ वाढवण्यावर भर दिला आहे. शिवगंगा खोऱ्याचा समावेश असलेल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये विद्यमान सदस्य तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर नागरिकांचे लक्ष आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवा, आणि युवकांसाठी रोजगाराचे प्रश्न हे स्थानिक पातळीवरील कळीचे मुद्दे ठरले आहेत. अनेक इच्छुकांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गावात गटबाजी की विकासाची लढाई? ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने गावांमध्ये गट-तट सक्रिय झाले आहेत. काही गावांमध्ये ही निवडणूक ‘विकास’ या मुख्य मुद्यावर केंद्रित असेल, तर अनेक गावांमध्ये पारंपरिक राजकीय वैर आणि कुटुंबातील वर्चस्व टिकवण्याचा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर हा यंदाच्या निवडणुकीचा महत्त्वाचा घटक बनला आहे. ‘चाय पे चर्चा’ ठरतेय केंद्रस्थान.. सध्या शिवगंगा खोऱ्यातील चहाची हॉटेल्स, पारावरचे कट्टे आणि मंदिराचे ओटे हे निवडणुकीच्या चर्चेचे मुख्य केंद्र बनले आहेत. ‘कोणते पक्ष एकत्र येणार?’, ‘कोणता गट कोणाला आव्हान देणार?’, आणि ‘नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का?’ यावर मतदारांमध्ये चर्चा झडत आहेत. महिला बचत गट आणि तरुण मंडळे यांची मते निर्णायक ठरणार असल्याने, त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे. एकंदरीत, शिवगंगा खोऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने एक मोठी राजकीय लढाई पहायला मिळणार आहे. या निवडणुकीत कोणते नवीन चेहरे उदयास येतात आणि कोणते प्रमुख राजकीय गट आपला गड राखतात, याकडे संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.