प्रभात वृत्तसेवा पानशेत – सिंहगड परिसरातील कल्याण, कोंढणपूर, रहाटवडे, आर्वी, मोरदरी, शिवतारे वाडी, डोणजे, खानापूर, गोऱ्हे खुर्द, गोऱ्हे बुद्रुक, खामगाव मावळ, थोपटेवडी, मालखेड, वरदाडे यांसारख्या गावांमध्ये सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. ‘गावच राजकारण जिल्ह्यात गाजतंय’, या उक्तीप्रमाणे इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, गावच्या वाड्या-वस्त्यांपासून ते हॉटेलांपर्यंत सर्वत्र नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. ग्रामपंचायतीसाठी भाव-भाव रिंगणात; कौल कुणाला? ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळत आहे. काही गावांमध्ये अनेक वर्षांनंतर सरपंचपदासाठी आरक्षित उमेदवारी आल्याने कुटुंबातील, नात्यातील तसेच भावकीतील लोक एकमेकांविरुद्ध रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे या गावांमध्ये ‘तू तू-मे मे’ सुरू असून, भावकीत आणि गटा-तटात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. सरपंचपदासाठी होणारी ही भाऊबंदकीची लढाई आणि त्यातून निर्माण झालेली राजकीय समीकरणे पाहता, येथील जनता कोणाला कौल देणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू.. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी वाढवल्या असून, विकासकामांच्या आणि वैयक्तिक समस्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर ही चुरस आणखी वाढणार आहे. परिसरातील हॉटेल्स बनले चर्चाचे केंद्र.. सध्या या सर्व गावांमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. गावातील हॉटेल्स, चहाची दुकाने, चौकाचौकांत होणाऱ्या बैठकांमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीवर आणि संभाव्य उमेदवारांवर चर्चा होत आहेत. कोण कोणत्या गटातून उभा राहणार, कोणाची बाजू कोण घेणार, याबद्दलचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.