nagar | स्थानिक गुन्हे शाखेची संगमनेरात वसुली ?

संगमनेर, (प्रतिनिधी) – शहरासह तालुक्यात अनेक अवैध धंदे जोरात सुरू असून याकडे स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलेच आहे परंतु कधीतरी कारवाया करणारी स्थानिक गुन्हे शाखा आता संगमनेरमधून वसुली करत असल्याचा आरोप एका तक्रारदाराने वरिष्ठांना दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे.
संगमनेर तालुक्यात मटका, अवैध वाळू उपसा, गुटखा, चोरून दारू विक्री असे अनेक अवैध व्यवसाय बिनदिक्कत सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एका घटनेत सुगावा घेत स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी संगमनेरच्या एका भंगारवाल्याला घेऊन गेले.
त्याने त्याचे तोंड उघडले असता त्याच घटनेतील समनापूर येथील आणखी एका भंगार व्यवसायिकाचे नाव समोर आल्याने संगमनेरहून नगरला जात असताना त्याला भेटून मोठी तडजोड केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. असे असतानाच आता काही कर्मचाऱ्यांनी शहरातील एका गुटखा तस्करांकडून दोन लाख 25 हजारांची खंडणी वसूल केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेतील चार कर्मचाऱ्यांनी संगमनेर शहरात येऊन कारवाईच्या नावाखाली दोन गुटखा विक्रेते यांच्याकडून बेकायदेशीरपणे वसुली केलेल्या 2 लाख 25 हजारांच्या खंडणी वसुलीची सखोल चौकशीसह त्यांच्या विरुद्ध खंडणी व जबर चोरीचे गुन्हे दाखल करून चारही पोलीस कर्मचारी यांना निलंबित करावे, अशी विनंती तक्रारदाराने केली आहे. त्यामुळे आता पोलीस अधीक्षक त्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचे आहे .




