कटिहार – बिहारमधील कटिहार जिल्ह्यात सोमवारी एका स्थानिक भाजप नेत्याची त्याच्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. संजीव मिश्रा असे हत्या झालेल्या स्थानिक भाजप नेत्याचे नाव आहे.
ते माजी जिल्हा परिषद सदस्य होते. ते आपल्या घराजवळ काहीं जणांशी बोलत असताना मोटार सायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यापुर्वीच ते मरण पावले.
सकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली आणि काही तासांतच मिश्रा यांचे समर्थक पोलिस स्टेशनच्या बाहेर जमले आणि त्यांनी तेथे मोठ्या प्रमाणावर दगडफेक केल्याचेही वृत्त आहे. भाजपने म्हटले की, राज्यात जेव्हापासून महागठबंधन सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून राजकीय हत्या सुरू झाल्या आहेत.
Delhi : उपमुख्यमंत्री सिसोदियांच्या अडचणीत वाढ, उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणातील आरोपीच…
दरम्यान, घटनेची माहिती परिसरात पसरली. लोक संतप्त झाले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मुख्य मार्गावर बॅरिकेड टाकून रास्ता रोको केला आणि आंदोलकांनी वाहनांची जोरदार तोडफोड करण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच पोलिस तिथे पोहोचले आणि लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला.