लोन ऍप्सवर पूर्णपणे बंदी घालणार ! सरकारने गुगल आणि ऍपलला दिले आदेश

नवी दिल्ली – झटपट कर्ज देणाऱ्या ऍप्सच्या माध्यमातून कर्जवसुली आणि अवास्तव व्याज आकारणीसंदर्भात तुम्हालाही धमक्या येत असतील तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतात सर्व प्रकारच्या झटपट कर्ज देणाऱ्या ऍप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी सरकारने गुगल आणि ऍपलला आदेश दिले आहेत. लोन ऍपच्या माध्यमातून लोकांची होत असलेल्या फसवणुकीबाबत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, आज गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल ऍप स्टोअर या दोन्हींवर अनेक ऍप्लिकेशन्स आहेत, जे भारतीय नागरिक वापरतात. कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता जी कर्जे दिली जात आहेत, त्या कंपन्यांचा शोध सरकार घेत आहे.
राजीव चंद्रशेखर म्हणाले की, गुगल आणि ऍपल या दोन्ही कंपन्यांना आदेश दिला आहे की, त्यांनी त्यांच्या स्टोअरवर असुरक्षित किंवा बेकायदेशीर ऍपची यादी सादर करू नये. सर्व डिजिटल नागरिकांसाठी इंटरनेट सुरक्षित आणि विश्वासार्ह ठेवणे हा आमच्या सरकारचा उद्देश आणि ध्येय आहे.
हे ऍप्स पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आरबीआयसोबत लवकरात लवकर बैठक घेतली जाईल आणि यादी तयार केली जाईल. ती यादी आल्यानंतर, त्या यादीत समाविष्ट असलेल्या ऍप्सनाच झटपट कर्ज देताना रिझर्व्ह बॅंकेची नियमावली आणि परतफेडीचे निकष लागू केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.





