लोजपने नुकसान केले जेडीयुचे

पाटणा – चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने आपले उमेदवार बिहार विधानसभा निवडणुकीत उभे केले नसते, तर जनता दल संयुक्त हाच पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असता, असे निवडणूक विश्लेषकांनी म्हटले आहे. लोजपाने एकूण 137 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 40 ठिकाणी जेडीयुचे उमेदवार अल्पशा फरकाने पराभूत झाले. अन्यथा नितीशकुमार यांचाच पक्ष बिहार निवडणुकीत “सिंगल लार्जेस्ट पार्टी’ ठरला असता.
यामध्ये दरभंगा ग्रामीण, एकमा, गायघाट, इस्लामपूर, महाराजगंज, महिषी, सुलतानगंज, साहेबपूर कमल, राजापकर, मटिहानी, मोरवा, नाथनगर, परबट्टा, लौकाहा, माहनार, महुआ आणि कडवा यासारख्या जागांचा समावेश होता. उदाहरणार्थ, दरभंगा ग्रामीणमध्ये आरजेडीचे उमेदवार ललितकुमार यादव यांना, 64,929 मते (41.26 टक्के) मिळाली आहेत, तर जद (यू) चे फराज फात्मी यांना 62,7888 मते (39.9 टक्के) आणि लोजपाचे उमेदवार प्रदीप कुमार यांना 17,506 मते मिळाली (11.9 टक्के ).
एकमा मतदारसंघात आरजेडीच्या श्रीकांत यादव यांना 53,875 मते (35.05 टक्के) मिळाली आहेत, तर जद (यू) च्या सीता देवी यांना 39,948 मते (25.99टक्के) आणि एलजेपीच्या कामेश्वर सिंग यांना 29,992 मते (19.91 टक्के) मिळाली. त्याचप्रमाणे गायघाटमध्ये आरजेडीचे उमेदवार निरंजन रॉय यांना 50,433 मते (32.48 टक्के) मिळाली आहेत, जदयूचे उमेदवार महेश्वर पी.डी. यादव यांना 44,588 मते (28.76 टक्के) आणि लोजपाचे उमेदवार कोमल सिंग यांना 32,242 मते (20.76 टक्के) मिळाली.
इस्लामपूरमध्ये आरजेडीचे उमेदवार राकेश कुमार रौशन यांना, 68,088 मते (41.55 टक्के), जद (यू) चे चंद्र सेन प्रसाद यांना, 64,390 मते (39.39 टक्के) मिळाली आणि लोजपाचे नरेश प्रसाद सिंग यांना 8,597 मते (5.6 टक्के) मिळाली. महाराजगंजमध्ये कॉंग्रेसचे विजय शंकर दुबे यांना 48,825 मते (30.07 टक्के), जद (यू) चे हेम नारायण साह यांना, 46,849 मते (28.86 टक्के) आणि एलजेपीचे देव रंजन सिंग यांना 18,190 मते (11.6 टक्के) मिळाली.
याचाच अर्थ, जर लोकजनशक्तीचे उमेदवार नसते, तर तेजस्वी यादव यांचाही तितकासा प्रभाव पडलेला नाही, हे सिद्ध झाले असते आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.





