Delhi : राजधानी दिल्लीत भरणार साहित्यिकांचा मेळा! आजपासून मराठी साहित्य संमेलनास सुरूवात; मोदी, शरद पवार, फडणवीस येणार एकाच मंचावर

नवी दिल्लीः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दिल्लीत तब्बल सात दशकांनंतर भरत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे महत्व विशेष असणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार आहेत. सरहद या संस्थेने संमेलनाचे आयोजन केले आहे.
या संमेलनाला आज दुपारी साडेतीन वाजता सुरूवात होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार आहेत. यामुळे या संमेलनाच्या उद्घाटनानंतर कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
या संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. डॅा. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. संमेलनासाठी २ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. साहित्य संमेलनाच्या सुरूवातीला ग्रंथदिडी निघणार आहे. संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व घटनाकार डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पाहार अर्पण करून ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे.
या संमेलनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आशीष शेलार, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.
विशेष रेल्वे
या साहित्य समंलेनासाठी साहित्यिकांसाठी विशेष रेल्वे एक्सप्रेस रेल्वेगाडीचे आयोजन करण्यात आले असून रेल्वे दिल्लीकडे रवाना झाली आहे. या एक्सप्रेसमध्येही साहित्य संमेलन रंगणार आहे. रेल्वेच्या बोगीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सप्रेस रेल्वेला महापराक्रमी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे.





