ऐकावं ते नवलंच! प्राणी संग्रहालयातून चक्क अजगर, पाल, सरडा गेले चोरीला; मुंबईतील घटना

मुंबई – आतापर्यंत आपण सोने-चांदी, गाडी, पैसे यासारख्या वस्तूंच्या चोरीच्या घटना सतत ऐकत आली आहोत. मात्र आता प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील
मरीन ॲक्वा झू मधून प्राण्यांची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मरीन एक्वा झूमधून ६ अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरीला गेला आहे. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मरीन एक्वा झू मधील कथित अनधिकृत बांधकामावरती पालिकेने सोमवारी कारवाई करत बांधकामावर हातोडा चालवला होता. या कारवाईनंतर लगेचच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेले आहेत. दरम्यान प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप प्राणी संग्रहालय प्रशासनाचा होता.
दरम्यान चोरीला गेलेल्या या प्राण्यांची किंमत साडेचार लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. झू मधून प्राणी अचानक चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेनंतर प्राणी संग्राहालय तात्पुरते बंद असणार असल्याच फलक देखील लावण्यात आला आहे
मगरीचे पिल्लूचे आढळले होते स्विमिंग पूलमध्ये
मागील महिन्यात या प्राणी संग्रहालयातील मगरीचे पिल्लू शेजारी असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावामध्ये आढळले होते. या प्रकरणाची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. तेथील स्वीमिंग पूलची सफाई करताना कर्मचाऱ्यांना पाण्यामध्ये मगरीचं एक छोटं पिल्लू आढळलं. त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने कारवाई करत या पिल्लाला सुखरूप पकडण्यात आले. हे पिल्लू वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले होते.





