पुणे जिल्हा | गोव्यातून आलेला मद्याचा साठा जप्त

बारामती, (प्रतिनिधी)– गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग दौंड यांनी धडक कारवाई करीत रुपये १२ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्यासह एकूण ३० लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नामदेव हरिभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे, महेश गुलाबराव औताडे (सर्व रा. अहमदनगर), असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग राजपुत, उपअधीक्षक उत्तमराव शिंदे,
सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग या पथकाने गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता असलेल्या मद्याची अहमदनगर जिल्ह्याकडे होत असलेल्या वाहतुकीवर धडक कारवाई केली. गोवा राज्य निर्मित मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते.
त्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग, या पथकाने मोहिम राबवून, मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार वाहनांच्या तपासणी दरम्यान बारामतीतील मोरगाव- सुपे रस्त्यावर मुर्टी हद्दीत हॉटेल सानिकानजिक संशयित वाहन व क्रेटा गाडी थांबवून वाहन चालकांकडे चौकशी केली.
दोन्ही वाहनचालक यांनी समाधानकारकपणे उत्तर न दिल्याने वाहनामध्ये आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड लपवून विविध विदेशी मद्य तसेच दोन चारचाकी वाहने दोन मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मद्यसाठा अहमदनगर जिल्ह्यात विक्री करण्याचे उद्देशाने परराज्यातून वाहतूक करुन आणल्याचे आरोपींच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद केला.





