Linear Garden Wakad : लिनिअर उद्यानाची दुर्दशा! मोडकी खेळणी आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; महापालिकेचे दुर्लक्ष
Linear Garden Wakad : खेळण्यांचा परिसरात खड्डे आणि राडारोड्यामुळे अपघाताची भीती; काम अर्धवट सोडल्याने नागरिकांचा संताप.

Linear Garden Wakad – वाकड-नाशिक फाटा मार्गावरील कोकणे चौक ते काटे पाटील चौक दरम्यान उभारण्यात आलेल्या लिनिअर उद्यानाची सध्या दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे उद्यान प्रशस्त जागा, भरपूर झाडे आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. सकाळ-सायंकाळ मोठ्या संख्येने नागरिक येथे फिरण्यासाठी येतात. मात्र, सध्या उद्यानातील स्थिती चिंताजनक बनली आहे.
लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी मोडली आहेत. काही खेळणी बाजूला काढून ठेवण्यात आली आहेत. झोपाळ्यांचे फक्त सांगाडे उरले आहेत. खेळण्यांच्या परिसरातील रेती कमी झाल्याने मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानात करण्यात आलेल्या काही कामांसाठी आणलेले दगड, रेती आणि पाइप तसेच पडून आहेत. काम अर्धवट सोडण्यात आले आहे.
हा राडारोडा थेट वॉकिंग ट्रॅकमध्ये असल्याने नागरिकांना चालताना अडथळा निर्माण होतो. याशिवाय भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांनी भीतीमुळे उद्यानात येणेही बंद केले आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. उद्यानाची दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.





