शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांचे अध्यक्ष पद संपुष्टात आले आहे. याबातच अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
21 फेब्रुवारी 2019 रोजी बाळासाहेब दोडतले यांची पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. महायुतीचा घटक पक्ष म्हणून रासपला ही संधी मिळाली होती.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवराव जानकर यांच्या सूचनेनुसार दोडतले यांना अध्यक्षपद मिळाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर रासपला फटका बसला असून महामंडळाचे अध्यक्षपद गमवावे लागले आहे.
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी
धनगर समाजाच्या उन्नतीसाठी अस्तित्वात आलेल्या शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ तसेच दौंड विधानसभा निरीक्षक बापूराव सोलंकर हे अध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत.
सुरुवातीला राष्ट्रीय समाज पक्षात धनगर समाजातील या दोन्ही नेत्यांनी मोर्चे, आंदोलने व सामाजिक कामातून स्वतःची छाप सोडली. मात्र रासपचे नेते महादेव जानकर यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याने रासपत घुसमट होत असलेल्या दोघांवरही राष्ट्रवादीची नजर होती.
शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपद कोणाला द्यायचे हे सर्वस्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ठरविणार आहेत. त्यामुळे धनगर समाजातील चर्चेतील या चेहऱ्यांना संधी मिळणार का? हे पाहणे औत्सुकक्यचे ठरणार आहे.





