Lightning strikes temple | देवस्थानावर वीजेचा कहर ; कळसाला तडे, मंदिरातील उपकरणांचे नुकसान

प्रभात वृत्तसेवा
लोणी धामणी – धामणी (ता. आंबेगाव) येथील द्रोणागिरी मळ्यातील जागृत देवस्थान असलेल्या गणेश मंदिरावर सोमवारी पहाटे तीनच्या दरम्यान वीज कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. विजेची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणावर होती. बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज झाला. कळसाचे सिमेंटचे तुकडे आजूबाजूच्या घरांच्या पत्र्यांवर पडले.कळसावर वीज कोसळल्याने कळसाच्या बांधकामाला तडा जाऊन खड्डा पडला आहे, अशी माहिती धामणी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव यांनी दिली.
गणेश मंदिराच्या जवळच लागून लोकवस्ती आहे. परंतु सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. रविवार मध्यरात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला आंबेगावच्या पूर्व भागात सुरुवात झाली. वीज पडून कळसाला तडे गेले असून मंदिरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. मंदिरात मजूर लोक झोपले होते. परंतु जीवित हानी झाली नसल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष नितीन जाधव, महेंद्र जाधव, सार्थक जाधव यांनी सांगितले.




