राजगुरूनगर : धावत्या एसटीत हत्या करणाऱ्यास आजन्म कारावासाची शिक्षा

राजगुरूनगर : धावत्या एसटीत मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस पी पोळ यांनी ही शिक्षा सुनावली आहे. अजित कान्हूरकर असे आरोपीचे नाव आहे. पुण्यातील खेड तालुक्यात 12 जून 2018 रोजी मामाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून ही धक्कादायक घटना घडली होती.
2018 ला घडलेल्या हत्येचा तब्बल साडे सहा वर्षानंतर निकाल लागला आहे. अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे मामाचा आणि मुलीचाही लग्न करण्यास नकार होता. या रागातून मामाचं कुटुंब संपवायचे अजितने ठरवले. याची सुरुवात मामाचा 18 वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसे पासून त्याने केली. श्रीनाथ आणि मामाची लहान मुलगी एसटीतून खेडच्या दिशेने निघाले. त्यावेळी मागच्या सीट वर बसलेल्या अजितने धारदार शस्त्राने सपासप वार केले.
अटकेनंतर देखील अजित तुरुंगातून पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता, इतकंच नव्हे तर थेट न्यायाधीशांच्या समोर गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहता आरोपी तुरुंगाबाहेर आला तर मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता अजितला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सुनावणीत सरकारी वकील म्हणून सागर कोठारी यांनी कामकाज पाहिले.





