पुणेकरांचे जगणे कठीण झाले; खासदार मेधा कुलकर्णी यांचा प्रशासनाला घरचा आहेर

पुणे – शहरातील घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक समस्या असून त्या सुटत नसल्याने पुणेकरांचे जीवन बिकट झाले आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असूनही पुण्याच्या समस्या सुटत नसल्याची तीव्र नाराजी राज्यसभेच्या सदस्य प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
पुणेकरांनी विश्वास टाकून आम्हाला निवडून दिले असून त्यांच्या समस्या प्रामाणिकपणे मांडणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही त्या म्हणाल्या. शहरातील विविध समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना व्हाव्यात, यासाठी त्यांनी शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या चर्चेतील मुद्दे पत्रकारांसमोर मांडले.
यावेळी शहरात सतत होणारी वाहतूक कोंडी ही आता गंभीर समस्या झाली आहे. अरुंद रस्ते, वाढती वाहने, आणि पथ विभागाचे चुकीचे नियोजन, यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच शहरातील अनेक भागात अपघातांचे प्रमाण वाढत असून रस्त्यांवरील डागडुजी, नियोजनाचा अभाव याला कारणीभूत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या.
अपुरा पाणीपुरवठा, विस्कळीत कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज लाईनची उपेक्षा, बेकायदा वृक्षतोड आणि पर्यावरण नियमांचे उल्लंघन याकडे महापालिका प्रशासन पाहणेच टाळते. नदी सुधार योजनेसाठी केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला असला तरी ही जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, योजनेच्या नावाखाली नदीचे पात्र संकुचित करून क्राँक्रिटीकरण करण्यात येत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.





