लेफ्टनंट संदेश थोरात जिल्ह्याचे नाव देशात उंचावतील – आ. बाळासाहेब पाटील

मसूर -देशाच्या सरंक्षण खात्यामध्ये सातारा जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. संदेश थोरात यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याने ते आणखी दृढ झाले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन केले. जिद्द, चिकाटीने प्रयत्न करून त्यांनी आज लेफ्टनंट ही पदवी प्राप्त केली असून ते आपल्या गावांसह जिल्ह्याचे नाव आपल्या कार्यकर्तृत्वाने देशभर उंचावतील, असा विश्वास राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
रहाटणी, ता. खटाव येथील संदेश संजय थोरात याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच पोलीस निरीक्षक (मुंबई क्राईम ब्रॅंच) अरुण राम थोरात यांनी मुंबई येथे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि शुभम निकम याची एक्साइज इन्स्पेक्टर पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नंदकुमार मोरे, जितेंद्र पवार, सी. एम. पाटील, संतोष घार्गे, सुरेश पाटील, फत्तेसिंह जाधव, भाऊसो लादे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले अरुण थोरात यांनीही आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले असून त्यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. एक्साइज इन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल शुभम निकम याचे देखील अभिनंदन करून आ. पाटील यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.





