प्रभात वृत्तसेवा कराड – येथील पालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आधी लोकशाही आणि नंतर लगेचच महाविकास आघाडीने मेळावा घेत समविचारी पक्षांना बरोबर घेणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या एकत्रिकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच भाजपने महायुती म्हणून निवडणूक न लढता ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यानंतर एकनाथ शिंदे गटाचाही मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर राजेंद्र यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या चार- पाच दिवसांत घडलेल्या या घडामोडी पाहता कराड पालिकेची निवडणूक तिरंगी अथवा बहुरंगी होण्याची शक्यता वाढली आहे.निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच भाजप ताकदीनिशी पालिकेच्या निवडणुकीत रिंगणात उतरणार तसेच कराडात कमळाचाच नगराध्यक्ष होणार, असे आमदार अतुल भोसले यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पोटात गोळा आला आहे. शिंदे गटाच्या राजेंद्र यादव यांनी दोन महिन्यांपासून आपणच कराडमध्ये महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहोत, असे म्हणून प्रत्यक्ष प्रचारही सुरू केला होता. मात्र, अतुल भोसले यांच्या या ‘स्टेटमेंट’ने त्यांच्या या प्रचाराला अचानक ‘ब्रेक’ लागला. हे होत असतानाच तिकडे महाविकास आघाडी बैठकावर बैठका घेत आहे. सुरुवातीला आघाडीच्या माध्यमातून लोकशाही आघाडीने कार्यकर्ता मेळावा घेत समविचारी लोकांना एकत्र करण्याचा सूर आळवला. त्यानंतर लगेचच काँग्रेसने महाविकास आघाडीची मोट बांधत कार्यकर्ता मेळाव्यात महायुतीला रोखण्यासाठी रणनीती निश्चित केली. महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वगळता सर्व पक्षांनी हजेरीही लावली. वरिष्ठ पातळीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा सुरू असून हा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे.महाविकास आघाडी म्हणून कराडमधील काँग्रेस, लोकशाही तसेच अन्य आघाड्या एकत्रित येत तिसरे पॅनेल टाकण्याच्या तयारीत आहेत. मागील निवडणुकीत भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा झालेला एमआयएम फक्त या निवडणुकीतील घडामोडीत सध्या चर्चेत नाही. मात्र, ऐन वेळी नगराध्यक्षपदाचा उमेदवार व काही ठिकाणी नगरसेवकपदाचे उमेदवार त्यांच्याकडून जाहीर होऊ शकतात. त्यामुळे कराड पालिकेची निवडणूक तिरंगी किंवा बहुरंगी होणार, यावर आता शिक्कामोर्तब होत आहे.आगामी काळात त्यामध्ये काही राजकारण होते का हे पाहण्यासाठी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.