LIC loss: युद्धामुळे एलआयसीला 70 हजार कोटींचा मोठा फटका; बँकिंग आणि L&T च्या शेअर्समध्ये मोठी घसरण!
LIC loss: २७ फेब्रुवारी रोजी युद्धाच्या घोषणेच्या एक दिवस आधी LIC चा पोर्टफोलिओ १४.८८ लाख कोटी रुपयांचा होता. मात्र ९ मार्चपर्यंत तो घसरून १४.१७ लाख कोटी रुपयांवर आला. म्हणजेच अवघ्या काही दिवसांत ४.७ टक्के म्हणजे ७०,१०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

LIC loss: अमेरिका-इस्राइल-इराण युद्धाचा थेट फटका भारतीय जीवन विमा महामंडळाला (LIC) बसला आहे. सरकारी मालकीच्या या विमा कंपनीच्या शेअर पोर्टफोलिओत तब्बल ७०,१०५ कोटी रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. यात बँकिंग क्षेत्र आणि लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीचे शेअर्स सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
पोर्टफोलिओत ४.७ टक्क्यांची घट
२७ फेब्रुवारी रोजी युद्धाच्या घोषणेच्या एक दिवस आधी LIC चा पोर्टफोलिओ १४.८८ लाख कोटी रुपयांचा होता. मात्र ९ मार्चपर्यंत तो घसरून १४.१७ लाख कोटी रुपयांवर आला. म्हणजेच अवघ्या काही दिवसांत ४.७ टक्के म्हणजे ७०,१०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच यंदा जानेवारीपासून ९ मार्चपर्यंत (YTD) LIC च्या पोर्टफोलिओत ७.१ टक्के म्हणजे १.०८ लाख कोटी रुपयांचा एकूण तोटा झाला आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून BSE सेन्सेक्स व निफ्टी ५० मध्ये सुमारे ४.५ टक्क्यांची घसरण झाली असून मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांत सुमारे ५ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.
बँकिंग शेअर्सना सर्वाधिक फटका
LIC च्या एकूण नुकसानापैकी सुमारे २१.८ टक्के म्हणजे १५,२९३ कोटी रुपयांचा तोटा हा स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक आणि HDFC बँक या तीन बँकांच्या शेअर्समधील घसरणीमुळे झाला आहे. इक्विनॉमिक्स रिसर्चचे संस्थापक जी. चोकालिंगम यांनी सांगितले की, युद्धामुळे महागाई वाढण्याची भीती आणि व्याजदर वाढण्याच्या शक्यतेने बँकिंग शेअर्सवर दबाव आला. त्यातच गेल्या काही महिन्यांत SBI सह अनेक बँकांनी चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे भू-राजकीय संकटात या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली.
हेही वाचा – सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी
L&T ला पश्चिम आशियातील व्यवसायाचा फटका
L&T कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे ११ टक्के म्हणजे ७,६०९ कोटी रुपयांची घसरण झाली. LIC कडे L&T मध्ये १२.७ टक्के हिस्सेदारी आहे. L&T च्या ३.५७ लाख कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ऑर्डर बुकपैकी तब्बल ७५ टक्के वाटा पश्चिम आशियाचा आहे. सध्या या प्रदेशात कंपनीचे १२,००० ते १५,००० कर्मचारी कार्यरत आहेत.
MK Global च्या विश्लेषकांनी सांगितले की, युद्धामुळे तीन महिन्यांचा विलंब आणि हायड्रोकार्बन विभागात कमी ऑर्डर्स मिळण्याची शक्यता लक्षात घेता, वित्त वर्ष २०२७-२८ मध्ये L&T च्या मुख्य कमाईत ११ ते १२ टक्क्यांची घट होऊ शकते. मात्र त्यांनी ४,८०० रुपयांचे लक्ष्य ठेवत ‘खरेदी’ रेटिंग कायम ठेवले आहे. मोतीलाल ओसवालच्या विश्लेषकांनीही दीर्घकालीन दृष्टिकोनातून आशावाद व्यक्त करत लक्ष्य किंमत ४,६०० वरून ४,४०० रुपये केली असून ‘खरेदी’ रेटिंग कायम ठेवले आहे.





