Gold-Silver Prices: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबतचे युद्ध संपुष्टात यण्याची शक्यता सुचित केल्यानंतर डॉलर कमकुवत झाला. त्यामुळे डॉलर केंद्री वित्तीय उत्पादनातील गुंतवणूक कमी झाली आणि सोने आणि चांदीची मागणी वाढली. परिणामी या दोन धातूच्या दरात मंगळवारी बरीच वाढ झाली. दिल्ली सराफात चांदीचा दर 10,975 रुपयांनी म्हणजे 4.09 टक्क्यांनी वाढून 2 लाख 79 हजार 275 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. गेल्या तीन दिवसापासून चांदीचा दर कोसळत होता. मात्र युद्ध संपुष्टात येणार असल्यामुळे चांदीचा दर पुन्हा वाढला असल्याचे दिसून येते. दिल्ली सराफात सोन्याचा दर मंगळवारी 400 रुपयांनी म्हणजे 0.24 टक्क्यांनी वाढून 1 लाख 64 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. लेमन मार्केट डेस्क या कंपनीचे विश्लेषक गौरव गर्ग यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरावर डॉलर वधारत असल्यामुळे दबाव येत होता. सोने, चांदी आणि शेअर बाजारातील गुंतवणूक डॉलरकडे वळत होती. आता युद्ध संपुष्टात येत असल्यामुळे परिस्थिती उलटी झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्यास मदत मिळत आहे. हेही वाचा – आखाती युद्ध मंदावण्याच्या शक्यतेने खनिज तेल स्वस्त; रुपया 36 पैशांनी वधारला जागतिक बाजारात चांदीचा दर 1.38 डॉलरने म्हणजे 1.6 टक्क्यांनी वाढून 88.33 डॉलर प्रति औंस झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर एक टक्क्यांनी वाढून 5,172 डॉलर प्रति औंस झाला. एचडीएफसी सिक्युरिटी या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, डॉलर कमकुवत होण्याबरोबरच अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा ही कमी होत आहे. आखातात युद्ध सुरू झाल्यानंतर डॉलरची मागणी वाढून डॉलरचा दर पंधरा आठवड्याच्या उच्चांकावर गेला होता. मात्र आता डॉलरमधील गुंतवणूक सोने आणि चांदीसह इतर क्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येते. खनिज तेल आता स्वस्थ झाले आहे. त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका कमी झाला आहे.