भाजप-काँग्रेसमध्ये ‘लेटरवॉर’!

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप नेत्यांकडून वादग्रस्त विधाने करण्यात येत आहे. तसेच भाजपच्या मित्रपक्षातील नेत्यांनी धक्कादायक विधाने केल्यानंतर काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्र लिहिले. यावेळी त्यांनी पत्रातून राहुल गांधींचा वादग्रस्त विधानांचा इतिहासच समोर आणला.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यासह ज्या नेत्यांनी राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधाने केली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
यावर प्रत्युत्तर देताना जेपी नड्डा पत्रामध्ये लिहितात की, आदरणीय खर्गेजी, राजकीय मजबुरीमुळे जनतेने वारंवार नाकारलेले तुमचे अयशस्वी उत्पादन पुन्हा एकदा पॉलिश करून ते बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहात. तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना लिहिलेले पत्र वाचून मला वाटले की तुम्ही जे बोलत आहात त्याचा वास्तव आणि सत्याशी काहीही संबध नाही.
या पत्रावरून असे वाटते की, राहुल गांधी आणि तुमच्या नेत्यांकडून करण्यात आलेले गैरवर्तन एकतर विसरला आहात किंवा जाणूनबुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्या गोष्टी सविस्तरपणे तुमच्या निदर्शनास आणणे मला गरजेचे वाटते.
ज्यांची मानसिकता संपूर्ण देशाला माहीत आहे. राहुल गांधींच्या आई सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींसाठी मृत्यूचे व्यापारी असा अत्यंत असभ्य शब्द वापरला होता. तुम्ही आणि तुमच्या पक्षाचे नेते या सर्व दुर्दैवी तसेच लाजिरवाण्या विधानांचा गौरव करत आहात. तेव्हा खर्गेजी, राजकीय मर्यादा कोणी मोडल्या?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
तुमच्या अयशस्वी उत्पादनाचा सतत बचाव आणि गौरव करणे ही तुमची मजबुरी आहे, पण किमान काँग्रेस अध्यक्ष असताना तुम्ही या गोष्टींचे आत्मपरीक्षण करायला हवे होते, असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला आहे.





