महायुतीतील दोन मंत्र्यामध्ये ‘लेटर वॉर’; शिरसाट यांना माधुरी मिसाळ यांचे सडेतोड उत्तर

Madhuri Misal Vs Sanjay Shirsat | सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकांवरुन ‘लेटर वॉर’ सुरु झाला आहे. शिरसाट यांच्या परवानगीशिवाय माधुरी मिसाळ यांनी विभागीय आढावा बैठका घेतल्याबद्दल टीका केली होती. तसेच शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत पत्र लिहिलं होतं. यावर आता माधुरी मिसाळ यांनी देखील पत्राद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे.
माधुरी मिसाळ यांनी आपली बाजू मांडत राज्यमंत्री म्हणून अशा बैठका घेण्याचा आपला अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले. त्यासाठी शिरसाट यांची पूर्वपरवानगी आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार काम सुरु असून मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतल्याचा मिसाळ यांनी पत्राद्वारे खुलासा केला आहे.
माधुरी मिसाळ यांनी पत्रात काय म्हंटले?
माधुरी मिसाळ यांनी आपल्या पत्रामधून सांगितले की, ‘सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे. सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही. बैठकीत कोणतेही निर्णय किंवा निर्देश दिले गेले नाहीत, फक्त अधिकाऱ्यांना सूचना केल्या गेल्या, जे त्यांच्या भूमिकेच्या कक्षेत आहे. आढावा बैठका घेऊन मी आपल्या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ केली नाही. शिरसाट यांनी दावा केल्यास त्यांनी उदाहरणे द्यावीत,’असे आव्हान मिसाळ यांनी पत्राद्वारे केले आहे.
‘मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना शासन कार्यकाळाच्या 150 दिवसांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत ही बाब आपल्याला अवगत असेलच. हे पाहता खात्याची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेणाचा मला अधिकार आहे व ती माझी जबाबदारी सुद्धा आहे. 19 मार्च 2025 रोजी दिलेल्या आदेशान्वये सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजा संदर्भात मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विषयांचे वाटप करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागांचा आढावा घेण्याचे आदेश मला देण्यात आले आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
“विभागाच्या राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विधिमत घेण्यात येत आहे.” याद्वारे मिसाळ यांनी अशा बैठकींसाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. Madhuri Misal Vs Sanjay Shirsat |
दरम्यान, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका परस्पर घेतल्याचा आरोप कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. त्यानंतर आता शिरसाट यांच्या पत्राला माधुरी मिसाळ यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. या पत्रासोबत त्यांनी शिरसाट यांनी लिहिलेलं पत्र देखील मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले आहे. Madhuri Misal Vs Sanjay Shirsat |
हेही वाचा :





