पानिपत येथील मराठा सैनिकांच्या स्मारकाचा विकास करू

पुणे –पानिपत येथील ऐतिहासिक युद्धातील मराठा सैनिकांच्या स्मारकाचा विकास केला जाईल. यासाठी योग्य ते सहकार्य करण्याबाबत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी दिले आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
नवी दिल्ली याठिकाणी विधिमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या प्रशिक्षणानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी प्रशिक्षण दौऱ्याची माहिती दिली. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शहरप्रमुख संजय मोरे, संगीता ठोसर, गजानन थरकुडे, विकास पासलकर, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी उपस्थित होते.
पानिपत स्मारकामध्ये ऐतिहासिक युद्धाबाबत सविस्तर माहिती पुस्तिका उपलब्ध व्हावी, प्रकाश योजना आणि ध्वनी चित्रफीत असलेला साऊंड शो सुरू करावा, सुरक्षेसाठी होम गार्ड व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवावे, हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे, अशा सूचना हरियाणातील प्रशासनाला दिले. त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे अश्वासन देण्यात आले.





