Rupali Patil Thombre : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विविध कारणांमुळे टीकेची झोड उठत आहे. नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी धीरभाई अंबानी हे पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरून मोठे झाले अशी टीका केली होती. समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भाषणाचा संदर्भ त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला. त्यानंतर काही काळातच विविध माध्यमांवर अजित पवारांचे हे भाषण दाखविण्यात आले. मात्र, त्या भाषणात अजित पवार चोरून नाही तर ‘सोडून’ म्हटले होते, असे असताना देखील त्यांच्यावर मोठी टीका झाली. अजित पवार यांच्याव होत असलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर सतत होणारी टीका हा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे. राज्यात कुठल्याही विभागाशी निगडीत काहीही घटना घडली की त्याला जबाबदार मात्र दादाच असं चित्र जाणीवपूर्वक निर्माण केलं जातंय, असा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. तसेच कौटुंबिक वाद सुद्धा पक्षाशी जोडून बदनामी केली जातेय, अस देखील त्या म्हणाल्या आहेत. वाढत वजन नेमकं कोणाच्या डोळ्यात खुपतंय? स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते, पाळीव समाजसेवक एक कलमी कार्यक्रम व मिशनवर असल्यासारखे राष्ट्रवादीच्या विरोधात पेटून उठतात. महाराष्ट्रात अजित दादाचं वाढत वजन नेमकं कोणाच्या डोळ्यात खुपतंय असा खोचक सवालही रूपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत वेगवेगळ्या समाज घटकांना अजितदादा सोबत घेऊन जात आहेत. यामुळेच राज्यातील बहुजनवादाची पाठराखण करणारे अनेक आजी-माजी आमदार, विविध जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश करत अजितदादा पवार यांचे नेतृत्व स्विकारले असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत. वाढत्या प्रभावाबाबत असुरक्षितता वाटू शकते विधानसभा निवडणुकीत जनतेने 41 आमदार विजयी करून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले असून त्यांचे नेतृत्व या स्थिर सरकारमधे अधिकच धारधार आणि जनसामान्यांपर्यंत वेगाने पोहचत आहे. ज्यामुळे त्यांचा प्रभाव वाढतो. यामुळे इतर नेत्यांना त्यांच्या वाढत्या प्रभावाबाबत असुरक्षितता वाटू शकते. शिवाय, अजितदादा पवार यांचे कठोर आणि शिस्तप्रिय नेतृत्व, पक्षसंघठन मजबूतीसाठी अविरत प्रयत्न आणि जनते सोबतच सततचा संवाद या बाबी प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची क्षमता राखतात ही असूया देखील त्यांच्या विरोधकांत असू शकते याबाबत शंका नाही. शेवटी कितीही समोर येऊ द्या त्यांना अजित दादा एकटा बास… असे म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेत जोरदार निशाणा साधला आहे. हेही वाचा : राजकीय रणधुमाळी ! सत्यजित भाजपमध्ये, देसाईंची पाटणमध्ये एन्ट्री; बऱ्याच दिवसांनंतर एकमेकांवर टीकास्त्र