Pune District : निरगुडसर-वळसेमळा येथे बिबट्या जेरबंद

मंचर : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील वळसेमळा येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबटया गुरुवार, दि.२ रोजी रात्री जेरबंद झाला आहे. बिबट्या पकडला गेल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी, नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
निरगुडसर येथून जवळच असलेल्या वळसेमळा येथे सोमवारी रात्रीच्या वेळी बिबट्या मुख्य रस्त्याच्या बाजूला फिरताना स्थानिक नागरिकांना दिसला होता. त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावावा. अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली होती.
वनविभाग तात्काळ पिंजरा लावेल. अशी खात्री नसल्याने निरगुडसरचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब वळसे पाटील, धनेश वळसे पाटील, कैलास वळसे पाटील यांनी स्वखर्चाने गाडी करून टेमकरमळा येथे असलेला पिंजरा मंगळवारी वळसेमळा येथे आणून वन विभागाचे कर्मचारी, स्थानिक शेतकरी राहुल वळसे पाटील, हरिष वळसे पाटील, ओमकार हिंगे, संदेश वळसे पाटील यांच्या मदतीने पिंजरा लावला होता. त्या पिंजऱ्यात गुरुवारी रात्री साडेसात वाजता बिबट्या जेरबंद झाला आहे.
दरम्यान पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असला तरी बिबट्याला पकडण्यासाठी स्वखर्चाने पिंजरा आणून लावावा लागत असल्याने ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब वळसे पाटील यांनी वनविभागाबाबत नाराजी व्यक्त केली.





