पुणे जिल्हा | सुलतानपूर येथे दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्या जेरबंद

मंचर,(प्रतिनिधी) – सुलतानपूर-एकलहरे (ता.आंबेगाव) येथील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग परिसरात अनेक शेळ्या-मेंढ्या, पाळीव प्राणांचा व कुत्रांचा फडशा पाडून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
रात्री व दिवसा सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने सुलतानपूर भागातील नागरिक भयभीत झाले होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे व शेतकरी बाबाजी टेमगिरे यांनी मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती, त्यानुसार पाच दिवसांपूर्वी वनविभागाने सुलतानपूर येथे टेमगिरे यांच्या निवस्थानाजवळ पिंजरा लावला होता.
आमिष म्हणून पिंजर्याच्या दुसऱ्या कप्प्यात शेळी ठेवली होती. पण सतत बिबट्या हुलकावणी देत होता. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती शेतकरी संजय शिंदे यांनी वनखात्याला दिली. जेरबंद झालेला बिबट्या पाहून गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक संपत तांदळे, एकनाथ ढोंगे यांनी बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात नेण्याची व्यवस्था केली. बिबट्याची तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी केली जाणार असल्याचे तांदळे यांनी सांगितले. बिबट मादी असून तिचे वय ७ ते ८ वर्षे आहे.





