शिरूर: बिबट्या प्रवण क्षेत्रातील नागरिकांचा संतप्त सवाल: सरकारला बिबट्या हवा की माणूस?

शिरूर : शिरूर आणि आंबेगाव तालुक्याच्या सीमेवरील भागात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे गेल्या दहा दिवसांत दोन निरागस बालकांचा बळी गेला. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील ५ वर्षांच्या शिवन्या बोंबे हिला अंगणातून ओढून नेल्यानंतर काहीच दिवसांत कुमशेत (ता. जुन्नर) येथेही अशाच प्रकारे दुसऱ्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, संतप्त नागरिकांच्या तोंडी एकच प्रश्न आहे: “सरकारला बिबट्या हवाय की माणूस?”
या सलग दोन घटनांमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून, प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्री तर सोडाच, पण दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर असल्याने शेतकरी, महिला आणि शाळेत जाणारी मुले प्रचंड असुरक्षित आहेत. अनेक गावांमध्ये शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे, तर पालक स्वतः मुलांना शाळेत घेऊन जात आहेत.
ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही वन विभागाने ठोस कृती केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. केवळ बैठका, पंचनामे आणि कागदोपत्री हालचालींवर कारवाई मर्यादित राहिली आहे. काही ठिकाणी पिंजरे लावले असले तरी बिबट्या पकडला गेलेला नाही.
ग्रामस्थांच्या तीव्र मागण्या:
-बिबट्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांचा वापर करावा.
-प्रत्येक गावात “बिबट्या प्रतिबंधक पथक” स्थापन करून प्रशिक्षण द्यावे.
-शाळा परिसर आणि रस्त्यांवर प्रकाश व्यवस्था वाढवावी.
-शेतांभोवती फेन्सिंग व सुरक्षा दिवे बसवावेत.
-पीडित कुटुंबांना तात्काळ भरपाई मिळावी.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, धोका वाढला असतानाही अनेक लोकप्रतिनिधी केवळ सोशल मीडियावरच प्रतिक्रिया देत आहेत. मानवाचे जीवन अधिक मौल्यवान आहे. वन्य प्राणी संवर्धनाच्या नावाखाली ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ होऊ नये. सरकारने आता फक्त बैठकीत न गुंतता, प्रत्यक्ष कारवाईतून लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी त्यांची मागणी आहे.





