Leopard Trapped : शिरूरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई; जातेगाव खुर्दच्या कंपनी परिसरातून बिबट्या जेरबंद
Leopard Trapped : जातेगाव खुर्द येथील झेड अँड एम फूड कंपनीच्या आवारात शेळ्यांची शिकार करणारा बिबट्या जेरबंद; वनविभागाच्या पथकाने तातडीने केली कारवाई.

Leopard Trapped – शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथील झेड अँड एम फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या परिसरात वारंवार दहशत माजवणारा एक नर बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. या बिबट्याने कंपनीच्या आवारातील काही शेळ्यांचा फडशा पाडला होता, तसेच तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला होता. यामुळे कंपनीचे कामगार आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
बिबट्याचा उपद्रव वाढल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, सोपान अनासूने आणि वन्यजीव बचाव पथकाने कंपनी परिसरात पिंजरा लावला होता. बुधवारी सकाळच्या सुमारास हा अंदाजे आठ वर्षे वयाचा नर बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन बिबट्याला ताब्यात घेतले.
या कारवाईवेळी कंपनीचे व्यवस्थापक किरण माळी यांच्यासह प्रवीण कौटकर, ललित पाटील व अन्य कर्मचारी उपस्थित होते. जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याची रवानगी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात करण्यात आली आहे. बिबट्या पकडला गेल्यामुळे कंपनी परिसरातील कामगार आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.





