Leopard Terror – पूर्व हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी, भवरापुर आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. भवरापूरचे पोलीस पाटील चंद्रकांत टिळेकर आणि टिळेकरवाडीचे पोलीस पाटील विजय टिळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या दररोज परिसरात फिरताना दिसत आहे. टिळेकरवाडीत देविदास टिळेकर यांच्या बंदिस्त गोठ्यात घुसून वासरावर हल्ला करण्यात आला. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच प्रविण मदने यांची शेळी, स्वप्निल जगताप यांचे वासरू व दोन शेळ्या, प्रकाश साठे यांचे वासरू, बाळू कोलपे यांची शेळी तसेच चंद्रकांत टिळेकर यांचे पाळीव कुत्रे यांच्यावरही बिबट्याने हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. भवरापूर येथे कांदे काढण्यासाठी गेलेल्या महिलांना सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली. या भीतीमुळे शेतीची कामेही मोठ्या प्रमाणात ठप्प झाली असून मजुरांनाही शेतात जाण्याची भीती वाटत आहे. ग्रामस्थांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शक्यतो रात्री बाहेर पडू नये, तसेच दिवसा शेतात जाताना एकटे न जाता गटाने जावे, काठीसारखी साधने सोबत ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांना एकट्याने शेतात न पाठवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, बिबट्याचा वावर ऊस पिकांमध्ये असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून रात्रीच्या वेळी तो जनावरांवर हल्ले करत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. “ज्या शेतकर्यांच्या जनावरांवर हल्ला झाला आहे, त्यांचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.” – संभाजी गायकवाड, वनक्षेत्रपाल