प्रभात वृत्तसेवा पुणे – लोहगाव विमानतळ आणि औंध परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभागाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.१९ नोव्हेंबरला पहाटे साडेपाच वाजता आणि पुन्हा सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी विमानतळाच्या परिसरात परिसरात एक बिबट्या दिसल्याचे २० नोव्हेंबर रोजी पुणे विमानतळ प्राधिकरणाने वन विभागाला कळवले आहे.लोहगावच्या हद्दीत गेल्या १५-२० दिवसांपासून बिबट्याचे निरीक्षण सुरू आहे. त्याला पकडण्यासाठी आधीच सापळा पिंजरा बसवण्यात आला आहे आणि परिसरात काही कॅमेरा ट्रॅप ठेवले आहेत. हवाई दल आणि विमानतळाच्या प्रतिबंधित परिसरात बिबट्याला प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना वन विभागाने विमानतळ प्राधिकरणाला आधीच कळवल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संवेदनशील क्षेत्रात बिबट्याचा प्रवेश रोखण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.दरम्यान, औंध येथील आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटीजवळ रविवरी सकाळी एक बिबट्या दिसला. पुणे वन विभाग आणि रेस्क्यू सिटी पथके याठिकाणी लक्ष ठेवून आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. सर्व सोसायट्या आणि नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र , पहाटे चार वाजल्यापासून त्याचे दर्शन झाले नाही. आमचे पथक रात्रीदेखील शोध घेतील आणि जागरूक राहील असे वनविभागाने कळवले आहे.