Leopard attack: मुलाला घेऊन पळणाऱ्या बिबट्यामागे आई धावली; ‘त्या’ एका क्षणाने फिरवले मृत्यूचे चक्र

प्रभात वृत्तसेवा
दावडी – अचानक झालेल्या हल्ल्यात बिबट्याने पाच वर्षीय देवांश गव्हाणे याला पकडले होते; मात्र मुलाच्या आर्त किंकाळ्या ऐकताच आई अश्विनी गव्हाणे हिने अक्षरशः ‘वाघिणीचे रूप’ धारण करत बिबट्याच्या मागे धाव घेतली. आईच्या या धाडसी प्रतिहल्ल्याने घाबरून बिबट्याने चिमुकल्याला सोडून पळ काढला. तत्पश्चात गावकर्यांच्या मदतीने या चिमुकल्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
खेड तालुक्यातील श्री क्षेत्र निमगाव खंडोबा परिसरात पाच वर्षीय देवांश गव्हाणे या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण घाटवस्ती परिसरात पुन्हा भीतीचं सावट दाटलं आहे. देवांश गव्हाणे हा आपल्या घराजवळ दरवाजात खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या शरीरावर खोल ओरखडे व चावा लागून तो गंभीर जखमी झाला.
तातडीने चांडोली ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.अचानक झालेल्या हल्ल्यादरम्यान बिबट्याने देवांशला पकडले होते; मात्र मुलाच्या आर्त किंकाळ्या ऐकून आई अश्विनी गव्हाणे हिने अक्षरशः ‘वाघिणीचे रूप’ धारण करत बिबट्याच्या मागे धाव घेतली. आईच्या या धाडसी प्रतिहल्ल्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला.
तत्पश्चात गावकर्यांच्या मदतीने देवांशला रुग्णालयात नेण्यात आले. अवघ्या तीन दिवसांत दोन चिमुकल्यांवर हल्ले झाल्याने निमगाव परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांत निमगाव व रेटवडीत बिबट्याच्या तीन हल्ल्यांच्या घटना घडल्या असून नागरिकांत तीव्र असंतोष आहे. रात्रीच्या वेळी शेतात किंवा रस्त्यावर जाण्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चांडोली रुग्णालयातील डॉक्टरांनी देवांशवर तातडीने उपचार सुरू केले असून आवश्यक तपासण्यांनंतर त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट केले. देवांशच्या आईने दाखवलेले धाडस ही संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, ग्रामस्थांनी वनविभागाकडे परिसरात पिंजरे लावणे, ट्रॅप कॅमेरे बसवणे आणि रात्री गस्त वाढवणे याबाबत मागणी केली आहे. मात्र वारंवार होणार्या हल्ल्यामुळे वनविभागाच्या उपाययोजना अपुर्या असल्याची ग्रामस्थांची टीका असून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.





