Pune District : निवे सारोळे गावाच्या परिसरामध्ये बिबट्याची दहशत, शेळ्या कोंबड्या फस्त

पौड : मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या निवे सारोळा येथे बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. येथील शेळ्या मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. सरूबाई शिंदे यांच्या अंगावर हाच बिबट्या धावून आला होता. त्यांनी त्याला विरोध करत बचाव करण्यासाठी आडोशाला आधार घेतला म्हणून त्यांचा जीव वाचला. तसेच काजा नावाच्या कातकरी समाजाच्या दोन कोंबड्या बंडा शिंदे यांच्या तीन कोंबड्या व बगळा नावाच्या कातकरी समाजाच्या तीन बकऱ्या फस्त केल्या आहेत.
ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. स्थानिक दुकानात तीन दिवसांमध्ये ग्राहक फिरकले नाही शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी किरण धांगवडिकर यांनी वनविभागाकडे केली आहे.
दरम्यान याबाबतची माहिती आमदार शंकर मांडेकर आणि मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अंकुश मोरे यांना ग्रामस्थांनी फोनवरून दिली असता वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शंकर मांडेकर यांनी त्या परिसरात गस्त वाढविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तसेच पिंजरा लावण्यासाठी सांगितलेले आहे.
याबाबत मुळशी तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप वन परिमंडल अधिकारी नंदकुमार शेलार आणि गणेश धुळशेट्टी वनरक्षक यांनी त्या ठिकाणी ग्रस्त वाढविलेली असून नागरिकांनी घराच्या बाहेर न पडण्याचे तसेच मुलांना बाहेर न सोडण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केलेले आहे त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये वनविभागाची तसेच रेस्क्यू या संस्थेची रेस्क्यू टीम रवाना केलेली आहे.





