Pune District : ओतूर येथे बिबट्या जेरबंद

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बाबीत मळ्यामध्ये वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांनी दिली.
ओतूर येथील बाबीत मळा येथे शुक्रवारी (दि. 3) पहाटे पाच वाजेदरम्यान पिजर्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच लहु ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरच्या वनपाल सारिका बुट्टे, ओतूरचे वनरक्षक विश्वनाथ बेले, उदापूरचे वनरक्षक दादाभाऊ साबळे, किसन केदार, गणपत केदार, फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव यांच्या पथकांने तेथे जाऊन सदर बिबट्याला पिंजर्यासह ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे सुखरूप दाखल केले.
बाबीतमळा येथील तुकाराम गीते, गणेश गीते, संस्कार गीते, शुभम गीते, कुणाल गीते, सार्थक गीते, अनिल गीते, पोपट मालकर, दत्ता मालकर, विकास गीते, वैभव आस्वार यांनी ही वनविभाग कर्मचार्यांना यावेळी सहकार्य केले. बिबट ही मादी असून अंदाजे सहा ते सात वर्षे वयाची असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. ओतूर, कपर्दीकेश्वर, बाबीत मळा, पाथरटवाडी, रहाटी या परिसरातील मार्गावर गेली 15 ते 20 दिवसांत तीन ते चार वेळा नागरिकांवर बिबट्याचा हल्ले झाले होते. यामध्ये नागरिक जखमी झाले होते. त्यामुळे वन विभागाला नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागले होते. परिसरातील नागरिकांनी वनविभाग कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले होते.
या पार्श्वभूमीवर बाबीत माळा येथे जेरबंद झालेल्या त्यामुळे काही प्रमाणात का होईना बिबट्याच्या बंदोबस्त झाला आहे. या परिसरात आणखी बिबटे असून ते बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले असून इतर उपाययोजना ही चालूच ठेवणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.





