अवसरी खुर्दमध्ये बिबट्या जेरबंद! वनविभागाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ, ग्रामस्थांकडून सुटकेचा निःश्वास

प्रभात वृत्तसेवा
मंचर – अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) परिसरातील वायाळमळा येथे वनविभागाच्या पिंजऱ्यात एक वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई गुरुवार, दि.२७ रोजी करण्यात आली.अमोल महादेव वायाळ यांच्या वस्तीशेजारी काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याच्या तक्रारीनंतर पिंजरा लावण्यात आला होता.
गुरुवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला असल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक एस. के. ढोले, बिबट शिघ्र कृती दलाचे बेस कॅम्प गावडेवाडीचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून काम केले.
या कारवाईत ग्रामस्थ गणेश वायाळ, वैभव पोपट वायाळ, संदेश शेलार, बाळासाहेब वायाळ आणि प्रसाद कराळे यांनी विशेष सहकार्य केले. पकडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या नियमानुसार सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वनविभागाने वेळेवर पिंजरा उभारून आणि ग्रामस्थांच्या मदतीने परिसरातील जनावरांवर तसेच नागरिकांवर होणारा धोका टाळल्याचे सांगण्यात आले.





