Leopard Captured: गाढवेपट येथे बिबट्या जेरबंद! नर बिबट ८ वर्षांचा असल्याचा अंदाज

प्रभात वृत्तसेवा
ओतूर – येथील गाढवेपट भागात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वन परिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली आहे. या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांकडून पिंजरा लावण्याची मागणी होत होती, त्या पार्श्वभूमीवर वनविभागाने केलेल्या कारवाईला यश आले आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन शेतकरी गजानन पानसरे यांच्या घराशेजारील शेतामध्ये सोमवारी (दि. २२ डिसेंबर) पिंजरा लावण्यात आला होता. त्यात रविवारी (दि. ४) पहाटे चारच्या सुमारास बिबट्या अडकला. याबाबत माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, किशन खरोडे, किसन केदार, गणपत केदार,
रोहित लांडे आणि प्रदीप तांबे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.स्थानिक शेतकरी राजाराम पानसरे, नरेंद्र डुंबरे, राजेश पानसरे, गजानन पानसरे, बाजीराव पानसरे, संतोष पानसरे, सुनील पानसरे व इतर नागरिकांच्या सहकार्याने बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलवण्यात आले.





