Nagar | नेवासा शिवारात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद ; वनविभागाला बिबट्या पकडण्यात यश

नेवासा, (प्रतिनिधी) – बहिरवाडी (ता.नेवासा) शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे वाड्या – वस्त्यांवरील शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांची पाचावर धारण बसलेली होती.वनविभागाने बहिरवाडी शिवारात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मंगळवारी (दि.२३) वनविभागाकडून पिंजरा लावल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास या बिबट्याला अलगदपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला सश आले. बुधवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या रिमझिम पाऊसामुळे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला टँक्टरच्या सहाय्याने पिंजऱ्यातून नेवासा फाटा येथील वनविभाग कार्यालयात आणण्यात आले.
या बिबट्याने गेल्या महिनाभरापासून परिसरात अनेक ठिकाणी शेळ्या, कुत्रे फस्त केल्याची घटना घडलेली होती. परिसरात प्रचंड घबराट निर्माण झालेली होती. शेतकऱ्यांना शेतीचे कामे जीव मुठीत धरून करावे लागत होते.
शाळकरी विद्यार्थ्यांना बिबट्याच्या धास्तीमुळे शाळेत जाण्यासाठी भीती वाटत होती. आता या बिबट्याला जेरबंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यासाठी वनरक्षक शिसोदे, वनपाल पातारे, कानडे, वनकर्मचारी मोरे, गाढे, घोरपडे यांनी विशेष सहाय्य केले.





