पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील चांडोह गावात मंगळवारी (20 मे) पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एकदा धुडगूस घातला. लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या संगिता अंकुश शिंदे (वय 50) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांच्या मानेवर खोल जखमा झाल्याने त्यांना तातडीने नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे चांडोह आणि परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून, मुक्तपणे संचार करणाऱ्या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. वनविभागाची त्वरित कारवाई – घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तीवरील बेस कॅम्पच्या पथकासह वनकर्मचारी महेंद्र दाते यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसराची पाहणी केली असून, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत. तरीही, सततच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती कायम आहे. हल्ल्याची थरारक घटना – संगिता शिंदे पहाटे लघुशंकेसाठी घराबाहेर आल्या असता, दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागील बाजूने त्यांच्या मानेवर हल्ला चढवला. शिंदे यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने शेजारील रहिवासी तातडीने धावत आले, ज्यामुळे बिबट्या पळून गेला. “प्रसंगावधान राखल्याने मी थोडक्यात बचावले,” असे भयभीत शिंदे यांनी सांगितले. या हल्ल्यामुळे त्यांच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्यांचा वाढता धोका – शिरूर तालुक्यातील बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, काठापूर खुर्द आणि चांडोह या गावांमध्ये गेल्या दोन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे सुमारे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांवर हल्ले झाले असून, पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः पावसाळ्याच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. बिबट्यांचा वाढता उपद्रव आणि वारंवार होणारे हल्ले यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. “वनविभाग फक्त पिंजरे लावून जबाबदारी झटकत आहे. प्रत्यक्षात बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही,” अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.