चाफळ परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुच

विविध गावात महिनाभरात अनेक जनावरांचा फडशा
चाफळ – चाफळसह परिसरातील गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुच असून चाफळ येथील बाळकृष्ण पाटील यांच्या एक वर्ष वयाच्या रेडकावर बिबट्याने हल्ला केल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. बिबट्या मानवी वसाहतीत घुसून हल्ले करु लागल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. चाफळ व परिसरात गेली अनेक महिन्यांपासून बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. असे असतानाही वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बिबट्यांनी काही दिवसांपासून थेट मानवी वस्तीत घुसून अनेक शेळ्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे दिवसाही ग्रामस्थ शिवारात जाण्यास घाबरत आहेत. चाफळ-उंब्रज रस्त्यावर शेरडूक नावाच्या शिवारात बाळकृष्ण पाटील यांचे जनावरांचे शेड आहे. या जनावरांच्या शेडमध्ये बिबट्याने घुसत रेडकावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात आजपर्यंत चाफळसह परिसरातील कोळेकरवाडी येथील तुकाराम कोळेकर, लक्ष्मी नगरातील विद्या कुरणे, नेताजी कुरणे, लक्ष्मण संकपाळ, नारायण टेकातील दत्तात्रय पवार, शिंगणवाडीत लक्ष्मण पवार व बापूराव पवार यांच्या शेळ्यांसह, वासरु, रेडकू ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
चाफळसह शिंगणवाडी, बोर्गेवाडी, वनवासवाडी, भैरेवाडी, गणेवाडी, डेरवण, खराडवाडीसह विभागातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. गत वर्षी शिंगणवाडी गावात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला. मात्र बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलाच नाही. अखेर वर्षभरानंतर हा पिंजरा नेण्यात आला. सध्या या भागातील बिबट्याचा वाढलेला संचार लक्षात घेता पिंजरा लावण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यादृष्टीने वनविभागाने पाऊले उचलावीत, अशी मागणी विभागातील जनतेतून जोर करू लागली आहे.





