प्रभात वृत्तसेवा शिरूर/ जांबूत – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात साडेपाच वर्षांच्या चिमुकलीचा बळी गेला.रविवारी (दि.१२) सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याने शिरूर आणि आंबेगाव तालुका हादरला आहे. बिबट्याच्या हल्ल्यावेळी चिमुकलीची सुटका केली. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिवन्या शैलेश बोंबे (वय साडेपाच वर्षे), असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. पिंपरखेड-जांबूत परिसरातील ही सातवी घटना आहे. ऐन दीपावलीच्या तोंडावर शिवन्याचा बळी गेल्याने गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवन्याचे आजोबा अरूण देवराम बोंबे हे त्यांच्या घरामागील शेतात जेसीबीने काम करीत होते. त्याचवेळी नात शिवन्या ही त्यांना पाणी देण्यासाठी शेतात आली. शेजारच्या चार फूट उंच उसात दबा धरलेल्या बिबट्याने अचानक शिवन्यावर झडप टाकली. क्षणातच बिबट्याने चिमुकलीला ओढत नेले. आजोबांनी हे दृश्य पाहून दोनशे फुटांवरून धावत जाऊन बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले. तात्काळ तिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले. यावेळी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचर रुग्णालयात कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली.