प्रभात वृत्तसेवा शिरूर – पिंपरखेड (ता. शिरूर) येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवन्या बोंबे या साडेपाच वर्षांचा निरागस चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आणि वाढत्या बिबट्यांच्या दहशतीच्या विरोधात शिरूर, आंबेगाव, जुन्नर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील संतप्त ग्रामस्थांनी बेल्हा–जेजुरी मी महामार्गावरील पंचतळे (जांबूत) चौकात रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन छेडले. यावेळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मात्र नागरिकांनी ठीय्या सोडला नाही. “आमच्या शिवन्याला न्याय द्या, बिबट्यांपासून आमचे रक्षण करा!” या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. भर पावसातही ग्रामस्थांनी आंदोलन सुरू ठेवत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनात शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी सदस्य सुरेश भोर, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, अरुणा घोडे, दामुशेठ घोडे शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखीले, माऊली ढोमे तसेच परिसरातील सर्वच गावांचे सरपंच, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थाह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान, वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक दिलीप पवार, शुभम चव्हाण, राहुल भागवत व कर्मचारी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संतप्त नागरिकांनी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, बिबट्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे, आमचा संपूर्ण विभाग बिबटमुक्त करावा, अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी घटनास्थळी हजर होत आंदोलकांशी चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सर्व मागण्या शासनापर्यंत पोहचविणार असल्याचे सांगितले. तदनंतर मृत शिवन्या बोंबेची तीन महिन्यांची चिमुरडी बहीण शरयु बोंबे, आई दिव्या बोबें व नागरिकांच्या हस्ते तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.ग्रामस्थांच्या या निर्धारपूर्ण आंदोलनामुळे प्रशासन आणि वनविभागावर आता ठोस कारवाई करण्याचा दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काळात प्रशासन काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.